Night Witches

एकोणिसाव्या शतकाने औद्योगिक क्रांती पाहिली तर विसाव्या शतकाने दोन महायुद्धे! या दोन्हीही घटकांमुळे संपूर्ण पृथ्वीचा नकाशाच सर्वांगांनी बदलला. क्रांती असो वा महायुद्ध, दोन्ही वेळेस स्त्रियांनी पुरुषाच्या बरोबरीने आपलं योगदान दिलं. परंतु त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती हवी तशी मिळाली नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस सोव्हिएतला बहुमोलचं योगदान लाभलं ते ‘नाईट विचेस (Night Witches) या महिला रेजिमेंटचं. नाईट विचेस रेजिमेंट हा जगातला पहिला महिला रेजिमेंट होता.

ऑपरेशन बार्बरोसा:

हिटलरचं ऑपरेशन बार्बारोसा (Source)

1939च्या अखेरीस युरोपात द्वितीय महायुद्धाच्या ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली. याच दरम्यान जर्मनी व सोव्हिएतमध्ये एकमेकांवर हल्ला न करण्याचा करार झाला. परंतु हिटलरची महत्वाकांक्षा व विस्ताराचे धोरण त्याला गप्प बसू देत नव्हते. सन १९४१ मध्ये जर्मन सैन्याने पश्चिम सोव्हिएतची सीमा ओलांडली. दोन राष्ट्रांमधील शांतता कराराचे उल्लंघन करून नाझी सैन्याने मॉस्कोवर आक्रमण करण्यास सुरवात केली. यालाच हिटलरचं कुप्रसिद्ध ‘ऑपरेशन बार्बरोसा’ असे म्हणतात. युद्धाची चुणचुण लागताच नाझींना राजधानीवर कब्जा करण्यापासून रोखण्यासाठी सोव्हिएतचे सैनिक आघाडीवर गेले. मात्र नाझी सैन्याचे यात फार काही असे नुकसान झाले नाही. 

नाईट विचेसच्या स्थापनेची सुरुवात:

सोव्हिएत सैन्य जेमतेम युद्ध मोहीमा पार पाडत होतं. युद्धात होत असलेल्या हानीची तर गणना नव्हती. असंख्य महिलांनी आपल्या घरातले पुरुष युद्धात गमावले होते. राष्ट्रप्रेमाखातर या महिलांनी युद्धात भाग घेण्यासाठी मेजर मरिना रास्कोवा यांना पत्र लिहिले. सोव्हिएत हवाई दलातल्या बऱ्याच महिलांनी त्यावेळी पायलट प्रशिक्षण घेतलेलं होतं. सैन्याची झालेली हताश अवस्था व महिलांची युद्धात सहभागी होण्याची ओढ पाहून मेजर मरिना रास्कोवा यांनी जोसेफ स्टॅलिन (तत्कालीन सुप्रीम कमांडर व पीपल्स कॉमिसर्स परिषदेचे अध्यक्ष) यांची ५८८ वी नाईट बॉम्बर रेजिमेंट सोबत अजून दोन रेजिमेंट्स तयार करण्यासाठी अनुमती मिळवली. 

मेजर मरीना रास्कोवा (Source : Pinterest)

१७-२६ वय वर्षे असलेल्या मुलींनी रेजिमेंट मध्ये भरती होण्यासाठी अर्ज केले. त्यांपैकी बऱ्याच जणींना ज्यांनी भूगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, केमिस्ट, गणितज्ञ ई बनण्याची इच्छा होती. दोन हजार अर्जांपैकी चारशे महिलांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या मुलींचे एंगल्स स्कूल ऑफ एव्हिएशन येथे कठोर प्रशिक्षण सुरू झाले. प्रत्येक मुलीला वैमानिक, नॅव्हिगेटर, देखभाल (maintenance) आणि ग्राउंड क्रू म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. बहुतेक सैनिकांना हे प्रशिक्षण घ्यायला कित्येक वर्षे लागायची. परंतु अपेक्षेपेक्षा कमी वेळातच मुलींनी हे प्रशिक्षण पूर्ण केले.

प्लायवूडपासून बनलेली विमाने:

Polikarpov po-2 ही प्लायवूडपासून बनवलेली जुनी हलकी विमाने होती. नवीनच शिकलेल्या नाईट विचेसनी ह्या विमानातून उड्डाणे केली. (Source)

हवाई आक्रमणासाठी सैन्याने त्यांना कालबाह्य झालेली Polikarpov Po-2 बायप्लेन दिली होती. ही हलकी टू सीटर, ओपन-कॉकपिट विमाने कधी लढण्यासाठी बनलेली नव्हतीच. या विमानांना त्यांची वैशिष्ट्ये पाहून ‘पंख असलेली शवपेटी’ असं म्हणत. या विमानाची वजन वाहण्याची क्षमताही कमी होती. म्हणून पायलट आणि नॅव्हिगेटर हे पॅराशूट ऐवजी बॉम्ब न्यायचे. कॅनव्हास व प्लायवुडपासून बनवलेल्या विमानाला कोणतेही संरक्षित घटक नव्हते. रात्री उडताना पायलटांनी अतिशीत तापमान, वारा आणि हिमबाधा सहन केली. कठोर सोव्हिएत हिवाळ्यामध्ये विमाने इतकी थंड व्हायची की, फक्त स्पर्श केल्याने कातडी सोलून निघेल. उत्तम संसाधनांचा अभाव असला तरी या महिलांनी जिद्द सोडली नाही. 

ह्या महिला रेजिमेंट दर रात्री नाझी सैन्याच्या छावण्यांवर विमानातून बॉम्ब सोडत. पायलट व नॅव्हिगेटर अशा दोन व्यक्तींच्या ४० क्रू बॉम्ब सोडण्यास सज्ज असत. उन्हाळ्यात रात्र लहान असल्यामुळे प्रत्येक रात्री ५-८ मिशन्स, तर हिवाळ्यात रात्र मोठी असल्याने दहाहून अधिक मिशन्स पार पाडली जात. कालबाह्य झालेल्या विमानांचा फार आवाज यायचा. जमिनीवर असलेल्या नाझी सैन्याला त्याची सहज चाहूल लागायची. पण विमानाचा आकार छोटा असल्याने ते रडारवर डिटेक्ट होणे अवघड होते. तीव्र उजेड पाडणाऱ्या सर्चलाइट्सच्या साहाय्याने नाझी सैन्य विमान शोधून काढून फायरिंग करत. वजन व उड्डाण गती कमी असल्याने विमानांना हालचाल करणं सोप्पं जाई. ह्याचा महिला रेजिमेंटला खूप मोठा फायदा झाला. पण जर फायरिंगमध्ये ही लाकडी विमाने टिपली गेली, तर ते काही क्षणातच ती आग लागून उध्वस्त होत. ह्यातही एका विमानावर जर नाझी सैन्याने नेम धरला, तर मागून दुसरे विमान येऊन त्याच्यावर बॉम्ब सोडून जाई. 

मैदानावर शौर्य गाजवूनसुद्धा महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांकडून वाईट वागणूक मिळत होती. त्यांना ‘द स्कर्ट्स रेजिमेंट’ म्हणून हिणवलं जायचं. परंतु नाझी सैन्यात त्यांना ‘नाईट विचेस (रात्री गस्त घालणाऱ्या चेटकिणी)’ म्हणून संबोधलं जाई. या रेजिमेंटच्या विमानांचा आवाज असा भासायचा जणू झाडूवर बसून चेटकिणींची टोळीच आकाशात उडत आहे.

कितीही बिकट परिस्थिती असली तरी तिच्याशी दोन हात करायचा आत्मविश्वास मेजर मरिना रास्कोवा यांनी या बहादूर महिलांमध्ये पेरला होता. “अभिमान बाळगा की तुम्ही एक स्त्री आहात”, हे मेजर रास्कोवा यांचे शब्द होते. नाईट विचेसचे शेवटचे उड्डाण ४ मे १९४५ रोजी झाले. तेव्हा नाईट विचेसनी बर्लिनपासून ६० किलोमीटर पर्यंत उड्डाण केले होते. त्याच्या तीन दिवसांनी जर्मनीने अधिकृतपणे आत्मसमर्पण केले. 

धाडसी देशभक्त नायिका:

(Source)

या धाडसी नायिकांनी ३०,००० पेक्षा जास्त मिशन्स केली. म्हणजेच प्रति पायलट आणि नेव्हिगेटरने मिळून सुमारे ८०० मिशन्स पार पाडली व एकूण २३,००० टन बॉम्ब नाझी सैन्यावर सोडले. या मोहिमेत एकूण ३० पायलट त्यांनी गमावले. उड्डाण करणाऱ्या २४ महिलांना ‘हिरो ऑफ सोव्हिएत युनियन‘ ही पदवी देऊन गौरविण्यात आले होते. या चळवळीच्या नेत्या मेजर रस्कोवा यांना ४ जानेवारी १९४३ रोजी वीरमरण आलं. युद्धादरम्यान सोव्हिएत एअरफोर्समधील सर्वात असामान्य व लक्षणीय सेवा केलेले युनिट असूनही, द्वितीय महायुद्ध संपल्यानंतर नाईट विचेस रेजिमेंटचे ६ महिन्यात विघटन करण्यात आले. जेव्हा मॉस्कोमध्ये विजय-दिवसाची मोठी परेड झाली तेव्हाही त्यांना समाविष्ट करण्यात आले नाही. त्याचं कारण म्हणजे, त्यांची धीम्या गतीची विमाने. 

या महिलांच्या प्रयत्न, जिद्द, त्याग व देशभक्तीला इतिहासाची पाने आजही सलाम करतात..

ओजस्वी पवार

(लेखिका अभियंता आहेत. आणि खगोलशास्त्र व जापनीज भाषेच्या अभ्यासिका आहेत.)


संदर्भ: हिस्टरी डॉट कॉम, पायलट्स हू बॉम्ब्ड नाझीस बाय नाईट- व्हॅनिटीफेअर, नाईट विचेस- डॉक्युमेंटरी फिल्म.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here